Popular Posts

Saturday, May 18, 2013



नातं तुझं-माझं..

समर्पित जीवनाचं, संवर्धित सौख्याचं
अंतरीक आपुलकीचं, मनस्वी मैत्रीचं !!

कनवाळ कारुण्याचं, लडिवाळ लाडाचं
मधाळ मायेचं, खट्याळ खोड्याच !!

लटक्या रुसव्याचं, हटक्या त्राग्याचं,
नटक्या नाराजीचं, मटक्या मनवण्याच !!

लोभस असण्याचं, सालस वागण्याचं
मोहक दिसण्याचं, रोचक वाटण्याचं !!

प्रेमळ हृदयीचं, निर्मळ मनाचं
हळव्या भावनांचं, गोडव्या प्रेमाचं !!

आत्मिक ऐक्याचं, सात्विक नात्याचं
नातं तुझं-माझं.. जन्मांतरीचं ऋणानुबंधाचं !!

-- संजय कुलकर्णी.
 
फितूर मन !!


मन झुरतंय, मन कुढतंय 
मन रुंजतंय, मन गुंजतंय 

मन घेवून तुझा माग ..
मन लाजेनं गालांत खुलतंय !!


मन धावतंय, मन शोधतंय
मन हरवतंय, मन गवसतंय

मन पाहून तुला वळताना..
मन आनंदानं स्वप्नांत झुलतंय !!


मन आरवतंय, मन आक्रंदतंय
मन कातवतंय, मन तांडवतंय

मन गुंगून तुझ्या आठवांत..
मन दु:ख्खानं विरहात बुडतंय !!


मन खट्याळ, मन वेल्हाळ
मन मधाळ, मन पाल्हाळ

मन होऊन फितूर लबाड..
मन प्रेमानं तुझ्यात जुळतंय !!

-- संजय कुलकर्णी.





प्रेम अंतरीचे ..


तिचे माझे भेटणे
तसे दररोज ठरायचे,
माझे तिचे बोलणे
तसे नेहमीचे असायचे !!

कधी मनमोकळे वागायचे
कधी घुम्यासारखे बसायचे,
कधी भडाभडां बोलायचे
कधी शब्दच विसरायचे !!

कधी एकरूप म्हणायचे
कधी मैत्रीपूर्ण सांगायचे,
एकमेकाशिवाय ना करमायचे
भेटल्यावर मात्र नाकारायचे !!

तसे प्रेम अंतरीचे
नजरेतून जरूर समजायचे,
कबूल करण्यास मनातले
दोघांनी आपसूक घाबरायचे !!

-- संजय कुलकर्णी.


एक भेट .. तुझी माझी !!


एक भेट
तुझी माझी संस्मरणीय घडावी..
एक साथ
सुंदर स्वप्नील सुरमणीय असावी !!

रातराणीच्या सड्यांनी
कुंद वातावरणी मृदगंध पसरावी.. 
लव्हबर्डसची झाडावरी 
जशी धुंद महफिल बहरावी !!

नीलरंगी साडीत 
निशांत तू निलपरी वाटावी.. 
निळेभोर आकाश 
जणु मज समवेत भासावी !!

फुलवून गुलाब 
हास्यातून गाली मदमस्त खुलावी.. 
तुझ्या सौंदर्याने 
चंद्रकोर नभीची ढगात झुरावी !!

नोकझोक गप्पांत 
ओढ प्रेमाची हृदयी वाढावी.. 
रोकठोक बोलण्यात 
जोड जीवाची जिवलग जाणावी !!

निरोपिता नयनांतून 
आपोआप धार अश्रूंची लागावी..
पुनर्भेटीची आस 
लावणारी उत्कट मिठी मारावी !!

-- संजय कुलकर्णी

Sunday, May 5, 2013







शिदोरी ...


आईपासून दूर जाताना 
तिच्याच जीवाचा तुकडा 

बिलगून म्हणतो आईला 
नको अडवू मला ..

उंबरठा ओलांडूनघराचा 
अन पदर सोडून मायेचा

बाहेरील चित्र-विचित्र जग
मुक्तपणे पाहू दे मला ..


सारी सृष्टी, निसर्ग माणसे
न्याहाळू दे मला ..


टक्के टोणपे, हाल अपेष्टा

मान अपमान,जय पराजय


सारे काही एकट्यानं

साहू दे मला ..

माणसा माणसातील 
देव,दानव 
ओळखू दे मला ..

काळजी करू नकोस ..
जरी मी 
एकटा, अकेला

तरी घाबरू नकोस ..
कारण माझ्याबरोबर साथ 

सदैव तू प्रेमाने शिकवलेली
अक्षय संस्कार शिदोरी ..!!

-- संजय कुलकर्णी




गुज मनीचे ...


त्याचे माझे भेटणे 
तसे दररोज ठरायचे, 

त्याचे माझे बोलणे 
तसे नेहमीचे असायचे ! 


कधी ऐसपैस मनमोकळे
कधी घुम्यासारखे बसायचे,

कधी भडाभडां बोलायचे
कधी शब्दच विसरायचे !


दो-तन एकरूप म्हणायचे
कधी मैत्रीपूर्ण सांगायचे,

एकमेकावाचून ना करमायचे
भेटल्यावर हमखास नाकारायचे !


तसे प्रेम हृदयातले
नजरेने अचूक समजायचे,

पण सांगायला मनातले
दोघेही आपसूक घाबरायचे ..!!

-- संजय कुलकर्णी.




अर्थ जीवनाचा ..!!

लाख क्षण अपूरे पडतात
अर्थ जीवनाचा समजण्यासाठी, 

एक क्षण पुरा पडतो
अर्थहीन आयुष्य बनण्यासाठी !!


कितीतरी दु:ख्खे भोगावी लागतात
मनासारखं सुख मिळविण्यासाठी,

थोडासा अहंकार कारणीभूत होतो
दु:ख्खाच्या खाईत पडण्यासाठी !!


कितीतरी नवस प्रदक्षिणा घालतो
अवकृपेपासून देवाच्या टाळण्यापासून,

एकदातरी प्रेमाने देवाला 
माझा 
म्हणतो का मनापासून ?


कितीतरी अपयशे पचवावी लागतात
यश पदरात पाडण्यासाठी,

जराशी बेपर्वाई निमित्त बनते
यश क्षणात घालविण्यासाठी !!


कितीतरी पावसाळे पहावे लागतात
मोल जीवनाचे जाणण्यासाठी,

काळ्याचे पांढरे व्हावे लागते
अनमोल जीवन उमजण्यासाठी !!


प्रेमाच बियाण पेरावं लागत
जन्माच नातं घडवण्यासाठी,

त्यागाच सिंचन करावं लागत
गेल्यावरही स्मरणात रहाण्यासाठी !!


-- संजय कुलकर्णी.